- नारायण गावस पणजी - कुंभारजुवा मतदार संघातील गवंडाळी रेल्वे फाटकाला उड्डाण पूल नसल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तसेच कामगारांना वेळेत पाेहचण्यात अडचण येत आहे. गेली अनेक वर्षे झाली आहे ओल्ड गोवा गवंडाळी ते मार्शेल मार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे साखळी वाळपईची वाहने आता बाणास्तरी मार्गे न जाता या मार्गाने जात आहेत. पण प्रत्येक तासात रेल्वे फाटक पडत असल्याने लाेकांचा वेळ वाया जात आहे. या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून हाेत आहे.
या मतदार संघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या अगोदर सांगितले आहे की या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पायाभरणी फेब्रुवारीत केली जाणार होती पण आता आचार संहीतेमुळे कादाचित हे पुढे ढकलण्यात आले असावे. त्यामुळे लाेकांना याचा त्रास हाेत असतो. रेल्वे फाटक पडल्यावर किमान १५ ते २० मिनीट वाहनचालकांचा वेळ वाया जात असतो. याचा जास्तीत जास्त फटका हा रुग्णवाहिकेला तसेच कार्यालयात जाणाऱ्या कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे.
या ठिकाणी उड्डाण पूल झाल्यावर लोकांचा वेळही वाचणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही पूर्वी या मार्गाने येत हाेते. पण आता रेल्वे फाटक पडून वेळ वाया जात असल्याने साखळी बाणास्तारी मार्गाने पणजीला जातात. मुख्यमंत्र्यांनीही या पुलाचा आढावा घेतला आहे.