पणजी: सोशल मीडियाचा वापर केवळ चांगल्या कामासाठीच करण्यात यावा. सोशल मीडियावर कुणाच्या धार्मिक भावना दुखावणारे किंवा श्रद्धेवर आघात करणारे पोस्ट टाकू नका अशी सूचना वजा इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग यांनी दिला आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून धार्मिक भावना भडकवण्याचे आणि दुखावण्याचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे लोकांची निदर्शने व मोर्चेही झाले आहेत. निदर्शकांनी महामार्गही रोखून धरला होता. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट आणि टिप्पण्या होत आहेत. श्रेया धारगळकर प्रकरणानंतर ही अनेक अशी प्रकरणे घडली आहेत. श्री लईराई देवीच्या होमखणाविषयीही असेच आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आले होते. मंगळवारी माप्सा येथे अशाच प्रकरणात एका युवकाला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे पोलीस महासंचालक डॉक्टर सिंग यांनी लोकांना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले आहे. तसेच धार्मिक भावना भडकवणारे आणि धार्मिक तणाव निर्माण करणारे पोस्ट सोशल मीडियावर न टाकण्याचा इशाराही दिला आहे.
सोशल मीडियावर कुणाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नका, गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग यांचा इशारा
By वासुदेव.पागी | Published: May 28, 2024 2:35 PM