पणजी : गोव्यात सेक्स टुरिझम व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन दिले जात नाही. राजकारण्यांनीही जबाबदारीने विधाने करावीत. गोव्याची प्रतिमा मलिन होऊ शकेल, अशी विधाने करू नयेत, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विरोधकांना दिला.
गोव्यात न्यूड पार्टी अयोजित केली जाईल असा खोटा संदेश पसरविणारा पोस्टर तयार करून त्याची जाहिरातबाजी केल्याबाबत पोलिसांनी अरमान मेहता ह्या बिहारी व्यक्तीला अटक केली. याविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. गोव्यात सन, सॅण्ड अॅण्ड सीच्या आकर्षणापोटी पर्यटक येतात. शिवाय गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनाचाही आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येतात. येथे सॅक्स व ड्रग्ज टुरिझमला थारा नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.राजकारण्यांनी जबाबदारीने बोलावे. जर ते गोवा म्हणजे सॅक्स टुरिझमची जागा आहे असे म्हणत असतील तर ते निषेधार्ह आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे अप्रत्यक्षरित्या कान उपटले. भविष्यात राजकारण्यांनी जबाबदारी बोलावे असा सल्ला त्यांनी दिला. गोवा सॅक्स व ड्रग्ज टुरिझममुळे प्रसार माध्यमांमध्ये गाजत आहे अशा अर्थाचे विधान एका राजकीय नेत्याने केले होते. मुख्यमंत्र्यांनी नामोल्लेख टाळला पण काही सल्ले दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नव्या पर्यटन मोसमानिमित्ताने गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 4 रोजी हंगाम सुरू होत आहे. गोव्यात असामाजिक किंवा बेकायदा कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. गोव्यात येणारे पर्यटक हे गोव्याविषयीच्या सुंदर आठवणी घेऊन परत जातील, असे अजगावकर म्हणाले. विदेशींना गोव्यात मद्यालय परवाना दिला जाणार नाही. नाईट लाईफ पर्यटनाविषयीही धोरण आखले जाईल, असे आजगावकर म्हणाले.