पणजी : गोवा विधानसभा निवडणूक कधी नव्हे एवढी रंगतदार आणि देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. देशाचे दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. तर आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी देखील अपक्ष उतरण्याची घोषणा केली आहे. आता आणखी एक लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे पर्ये होता. तेथूनही काँग्रेसचे कधीच पराभूत न झालेले प्रतापसिंह राणे आणि भाजपाकडून त्यांची सून उभी ठाकली होती. ही लढतही आता संपली आहे.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे हे काँगेसकडून १२ व्यांदा आमदारकीला उभे ठाकणार होते. तर भाजपात गेलेला त्यांचा मुलगा विश्वजित राणे हे वाळपई येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने प्रतापसिंह यांच्या मतदारसंघात त्यांची सून आणि विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या यांना सासरे प्रतापसिंह राणेंविरोधात उभे केले होते. यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी उतार वयामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
एकाच घरातून सासरे-सून लढत असल्याने राणे कुटुंबासमोर पेच निर्माण झाला होता. सत्तरीच्या इतिहासात प्रथमच सासरे व सून अशी लढत पाहावयास मिळणार होती. काही दिवसांपूर्वी प्रतापसिंग राणे व विश्वजित राणे यांच्यात शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली होती. त्यामुळे त्या कुटुंबातील अंतर्गत कलह दिसून आला होता. प्रतापसिंग राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे सुद्धा प्रचार शुभारंभ करण्यास उपस्थित होत्या. परंतू त्यांनी आज उमेदवारी मागे घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
''विधानसभेत ५० वर्षे पूर्ण झाली. आता निवडणुकीच्या राजकारणातून मला निवृत्त होऊद्या'', असे ते मागे म्हणाले होते. यामुळे पर्येत आता काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. प्रतापसिंह राणे हे यावेळी निवडणूक लढण्यास उत्सूक नव्हते. तरी देखील काँग्रेसने त्यांची मनधरणी करून उमेदवारी जाहीर केली होती. प्रतापसिंह यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता.