लाेकमत न्यूज नेटवर्क
पणजी :आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘१३-सूत्री गोवा मॉडेल’ या जाहीरनाम्याचे अनावरण केले. या १३ मुद्यावर आप गोव्यात विधानसभा निवडणूक लढणार आहे.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ने सरकार बनवल्यास गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत १० लाखांचा लाभ मिळेल. तसेच तरुणांना रोजगार, गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या तसेच प्रत्येकी ३००० रुपये बेरोजगारी भत्ता आदी मुद्यांचा या वचननाम्यात समावेश असल्याचे त्यानी सांगितले.खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू केले जाईल. तसेच त्याच कालावधीत जमिनीच्या हक्कांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासनही या जाहीरनाम्यातून दिले आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले की, आता मतदारांनी ठरवायचे आहे की त्यांना ५००० रुपयांना बळी पडायचे आहे की पाच वर्षांत १० लाखांचा फायदा होईल, अशा प्रामाणिक पक्षाला निवडायचे याचा निर्णय घ्यावा. जेव्हा आप सरकार स्थापन करेल, तेव्हा आम्ही एक नवीन गोवा निर्माण करू, जो इतिहास नष्ट न करता समृद्ध आणि विकासाला चालना देणारे राज्य निर्माण करण्यावर भर राहिल, असे ते म्हणाले.
ही आहेत वचने
- प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत १० लाखांचा लाभ- तरुणांना रोजगार- गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या- प्रत्येकी ३००० रुपये बेरोजगारी भत्ता- शाळांची स्थिती सुधारणा- मोफत शिक्षण- रुग्णालयांची स्थिती सुधारणा- मोहल्ला क्लिनिक सुरू करणार- १८ वर्षांवरील महिलांना रु. १००० प्रति महिना- उद्योगानुकूल धोरण- २४ तास मोफत वीज- अखंड पाणीपुरवठा- चांगले रस्ते
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा लाभ
एखाद्या कुटुंबाला रु. ५०० वीज बिल येते असे गृहीत धरले, तर वार्षिक ६ हजार भरते. मोफत वीज धोरणानुसार ही रक्कम माफ होईल. ३ हजार बेरोजगारी भत्त्यानुसार वार्षिक ३६ हजार मिळतील. महिलेला दरमहा १ हजार त्यानुसार वार्षिक २४ हजार, मोफत आरोग्य सेवेनुसार वार्षिक ४० ते ५० हजार वाचतील. मोफत शिक्षणानुसार वार्षिक ७२ हजार वाचतील. ही सर्व रक्कम एकत्रित केल्यास पाच वर्षात दहा लाख होते, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.