मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता प्रचाराला वेग आला आहे. अनेकविध पक्षांचे स्टार प्रचारक गोव्यात जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे, तशी रणधुमाळी वाढत चालली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. यातच निवडणूकपूर्व अंदाज येऊ लागले आहेत. एबीपी आणि सीव्होटर यांनी दिलेल्या अंदाजानुसार, गोव्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. गोव्यातील लढत अटी-तटीची होईल, असे म्हटले आहे.
गोवा विधनसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. सर्व्हेच्या अंदाजानुसार, गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. गोव्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे ३० टक्के मते मिळतील, तर काँग्रेस आणि आप पक्षाला प्रत्येकी २४ टक्के मते मिळतील. एमजीपी आणि मित्रपक्षाला ८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. अन्यना १४ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणून गोवेकरांची कुणाला सर्वाधिक पसंती?
भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून गोव्यातील लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जानेवारीत प्रमोद सावंत यांना ३३.५ टक्के, तर फेब्रुवारीत ३०.४ टक्के गोवेकरांनी पसंती दिली. त्याखालोखाल आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांना जानेवारीत १८.९ टक्के, तर फेब्रुवारीत १९.५ टक्के, भाजपचे उमेदवार असलेल्या विश्वजीत राणे यांना जानेवारीत १५.५ टक्के आणि फेब्रुवारीत १४.५ आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना जानेवारीत ८.६ टक्के तर फेब्रुवारीत ७.८ टक्के गोवेकरांनी पसंती दर्शवली.
कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार?
सर्व्हेमध्ये भाजपला ४० पैकी १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० ते १४ जागा मिळू शकतात. त्याशिवाय आम आदमी पक्षाला ४ ते ८ जागा मिळू शकतात. तर एमजीपीला ३ ते ७ जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य अथवा अपक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, गोव्यात ४० जागांच्या विधानसभेसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच ४० जागांसाठी तब्बल ३०१ जण राहिले असून प्रथमच उमेदवारांची संख्या विक्रमी आहे. भाजपने सर्व ४० मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती असून काँग्रेसने ३७ तर गोवा फॉरवर्डने ३ उमेदवार दिले आहेत. आम आदमी पक्षाने ३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मगोप-तृणमूल युतीनेही ३९ उमेदवार दिले आहेत. युवावर्गाच्या पाठिंब्यावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष प्रथमच रिंगणात आहे. या पक्षाने ३८ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी युतीने २३ तर अन्य लहान पक्षांनी १० मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार दिलेले आहेत.