लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : काँग्रेसचा राजीनामा देऊन अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी रविवारी संध्याकाळी तृणमूल सोडून सर्वांना धक्का दिला आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी रविवारी संध्याकाळी कुडतरी येथे आपल्या निवासस्थानी आपले कार्यकर्ते व समर्थकांची बैठक घेतली. त्या बैठकीत तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जावे अथवा अपक्ष निवडणूक लढवावी, मात्र तृणमूलच्या तिकिटावर लढू नये, असे ठरले. त्यानंतर रेजिनाल्ड यांनी तृणमूलच्या सदस्यपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांना पाठवून दिला. मात्र, राजीनामा पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. या राजकीय घडामोडीनंतर रेजिनाल्ड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना कुडतरीचे सरपंच मिलाग्रीस रॉड्रिग्ज म्हणाले की, आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना पंचायत मंडळाला विश्वासात घेतले नव्हते. तसेच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देतानाही विश्वासात घेतलेले नाही. सोशल मीडिया तसेच लोकांकडून समजते की, रेजिनाल्ड स्वगृही परतणार आहेत.
आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने कुडतरी काँग्रेस गट मंडळाने जिल्हा सदस्य मोरेनो रिबेलो, त्यांच्या पत्नी, शालोम सार्दीन व जोझेफ वाझ यांची नावे उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली आहेत. त्या चौघांपैकी एकाला उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, आता रेजिनाल्ड पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यास व त्याना उमेदवारी दिल्यास मतदार नाराज होऊ शकतात, असे मिलाग्रीस रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
- आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तरी या पक्षात ते खूश नव्हते. तृणमूलची कार्यपद्धती त्यांच्या अंगवळणी पडली नसावी. त्यामुळेच त्यानी तृणमूल सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अलिकडेच भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तर गोव्यातील एका राजकारण्याने रेजिनाल्ड यांना स्वगृही परतण्याचे तसेच काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने रेजिनाल्ड माघारी फिरले असावेत, अशी चर्चा कुडतरी मतदारसंघात सुरू आहे.
आलेक्स रेजिनाल्ड यांचे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे. आम्ही त्यांचे तृणमूल कॉंग्रेस पक्षात स्वागत केले होते. कारण आमच्याकडे अशा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. परंतु आता ते जात आहेत तर त्यांची इच्छा. त्यांना शुभेच्छा. - खासदार मोहुआ मोइत्रा, तृणमूल कॉंग्रेसच्या राज्य प्रभारी