लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव: राज्यातील जनतेला काँग्रेस पक्षच पर्याय आहे. आपण काँग्रेसचा राजीनामा देऊन जनतेच्या विकासासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये गेलो, पण तिथे आपला भ्रमनिराश झाला. विकासाबाबत आपल्याला जी आश्वासने दिली होती, ती पोकळ असल्याचे या पक्षात प्रवेश केल्यानंतर कळून आले. तिथे २७ दिवस आपली घुसमट झाली. या काळात काँग्रेस हाच पर्याय असल्याचे आपल्याला कळून चुकले. तृणमूलमध्ये प्रवेश करून आपण मोठी चूक केली, मला माफ करा. यापुढे आपण कधीच काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस तसेच कुडतरीतील मतदारांसाठी आपण झटत राहीन, असे आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आपण तृणमूलमध्ये प्रवेश करताना कुडतरीतील सर्व मतदारांना विश्वासात घेतले नव्हते, काही मित्र व मोजक्याच लोकांना विचारून पक्ष बदलाचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्यावेळी आपण तृणमूलच्या प्रचारासाठी घरोघरी जाऊ लागलो, त्यावेळी लोकांकडून विरोध होऊ लागला. कुडतरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या परप्रांतीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू नका. काँग्रेसमध्ये परत या अन्यथा अपक्ष लढा, असा आग्रह लोक करीत होते. त्यामुळे आपण स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले.
लोकशाहीत जनताच श्रेष्ठ असते, नेते नाहीत. नेत्यांना लोक घडवितात. तेव्हा लोकांना जास्त महत्त्व असते. त्यामुळे लोकांच्या विनंतीमुळे आपण काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे लोक जे सांगणार तेच आपण करणार आहे. मायकल लोबो यांनी वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करून आपला काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग सुकूर केला आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.