पणजी : ‘एके काळी भाजपकडून तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या १२ नेत्यांंना सर्वात भ्रष्ट नेते म्हणून संबोधले जायचे. आता त्यातील ९ नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली. ते भ्रष्ट नेते व त्यांच्यामार्फत स्थापन होणारे सरकार राज्याचे भविष्य बिगडवू शकतात,’ अशी टीका भाजपचे नेते व प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी केली.
पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंगळवारी देत असल्याचे जाहीर केले. ‘स्वच्छ राजकारण व्हावे व गोव्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असलेल्या उत्पल पर्रीकर यांना माझा पाठिंबा आहे. उत्पलसाठी पूर्णपणे काम करता यावे, यासाठी मी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे, असे ते म्हणाले.
नाईक गेले काही वर्षांपासून भाजप विरोधी आणि खासकरून मोन्सेरात दाम्पत्याच्या विरोधात काम करत होते. शेवटी संधी साधून त्यांनी राजीनामा दिला. ‘मोन्सेरात दाम्पत्यासारखे भ्रष्ट नेते कुठेही नाहीत. उत्पलने भ्रष्टाचाराविरोधात नवी लढाई सुरू केली आहे. या लढाईत माझा सहभाग असेल. पणजीसोबत ताळगावातही जेनीफर मोन्सेरात यांच्याविरोधात जो चांगल्या व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असेल, त्यालाही माझा पाठिंबा असेल.
मोन्सेरात कुटुंबीयांना त्यांची खरी जागा दाखविण्याची आम्हाला संधी मिळत आहे. या संधीचा उपयोग गोवेकरांनी करून, पुन्हा चांगले उमेदवार निवडावे,’ असे नाईक यांनी सांगितले. ‘भाजप सोडणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत मी भाजपसोबत राहीलो, परंतु आता पक्ष आधीसारखा राहिलेला नाही. जे नेते मनोहर पर्रीकरांना अपशब्द वापरत होते, त्याच नेत्यांना आज भाजपने जवळ केले हे पाहून वाईट वाटते. मला अनेक पक्षातून उमेदवारीसाठी ऑफर्स येत आहे, परंतु माझ्या मनात अजूनही भाजप आहे, असेही ते म्हणाले.