पणजी : साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने नाराज असलेल्या दिलीप परुळेकर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे साळगावचे उमेदवार जयेश साळगावकर यांचा निवडणुकीतील मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेते यांच्या उपस्थितीत परूळेकर यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.
तानावडे म्हणाले, नाराज असल्यानंतरही परुळेकर यांनी भाजप सोडला नाही. पक्षासोबतच ते राहिले. निवडणुकीत तिकीट मिळणेच सर्व काही नाही. ते अनेक वर्ष पक्षासोबत होते व त्यांनी पक्षाचे काम केले. प्रामाणिकपणे जो पक्षाचे काम करतो त्याचा पक्ष नेहमी सन्मानच करतो. पक्षासाठी ते नेहमीच काम करीत राहतील. निवडणुकीत मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यत केला.
भाजपाने आपल्याला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली यासाठी आभारी आहे. पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली ती निश्चितच आपण प्रामाणिकपणे पार पाडू. मध्यंतरी पक्षावर अपण नाराज झालो असलो तरी अन्य पक्षात जाण्याचा आपण कधीही विचार मनात सुद्धा आणला नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी साळगाव मतदारसंघात काम करू़, कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.