पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना तिकिट देण्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील, तर मनोहर पर्रिकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन करत मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केले जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला? भाजपवाले बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवले हा मोठा प्रश्न आहे, अशी टीका केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
संजय राऊतांना नटसम्राटामध्ये भूमिका द्यायला पाहिजे
उत्पल पर्रिकरांच्या बाबतीत परिस्थितीनुसार उत्तर मिळणार आहे. संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे. कारण ते सकाळी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे बोलायची उत्तम भूमिका करू शकतात. मनोहर पर्रिकर आजारी होते, तेव्हा नाकात नळी असताना त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडले होते, तेव्हा याच संजय राऊतांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्यातले सरकार आजारी आहे, सरकार चालवणे अयोग्य आहे, असे सांगितले होते. आता तेच संजय राऊतांचे मगरीचे अश्रू वाहत आहेत आणि आता ते उत्पल पर्रिकरांबद्दल बोलत आहेत. मनोहर पर्रिकर जेव्हा आजारी होते, तेव्हा तुमची काय भूमिका होती, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे राजकीय सोयीची भूमिका घेणे बंद केले पाहिजे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते टीव्ही९ शी बोलत होते.
काय म्हणाले होते संजय राऊत?
उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असे आम्ही सांगितल्यानंतर भाजपची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावेच लागेल, असे सांगत एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. मनोहर पर्रिकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान आहे. गोव्यात जो भाजप दिसत आहे, त्यात मनोहर पर्रिकर यांचेच योगदान आहे. गोव्यात भाजप पर्रिकरांच्या नावाने ओळखला जातो. गोव्यात, राजकारणात मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठे केले, तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगले वाटले नाही. त्यांना तिकीट देणे, न देणे ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिले जात आहे. उत्पल पर्रिकर यांचे ट्वीट मी पाहिले आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.