पूजा नाईक- प्रभुगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : गोव्याची राजधानी म्हणून पणजीला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व तिला राजकीयदृष्ट्या सुध्दा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जवळ येताच केवळ मतदारच नव्हे, तर राजकीय पक्ष, अभ्यासकांकडूनसुध्दा अन्य मतदार संघांच्या तुलनेत पणजीवर लक्ष अधिक केंद्रित केले जाते. त्यामुळे पणजीत आवाज कुणाचा? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घुमताना दिसू लागला आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा त्यांनी पराभव केला. त्यामुळे ज्या पणजीची केवळ पर्रीकरांचाच मतदारसंघ अशी ओळख होती, तो मोन्सेरात यांनी काबीज केला. मात्र काही महिन्यातच त्यांचा सूर बदलला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पणजीवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला.
तसे पाहिले तर २०१७ ते २०१९ या केवळ दोन वर्षाच्या काळात पणजीने तीन निवडणुका पाहिल्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये मूळ विधानसभा निवडणूक, केंद्रातून पर्रीकर गोव्यात आल्याने ऑगस्ट २०१७ मध्ये झालेली पोटनिवडणूक आणि पर्रीकर यांच्या निधनामुळे २०१९ ला झालेली पोटनिवडणूक. त्यामुळे पणजीकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. भाजप, काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली असतानाच पणजीत मात्र शांतता आहे. अधिकृतरित्या ना भाजपचे उमेदवार प्रचार करताहेत, ना काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय.
पणजीतून काँग्रेस माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, की उदय मडकईकर यांना तिकीट देते, याची वाट लोक पाहत असले तरी खरी उत्सुकता भाजप कुणाला तिकीट देते याबाबत आहे. बाबूश माेन्सेरात यांनाच भाजप तिकीट देईल असे म्हटले जात असले तरी, पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीसुद्धा भाजपकडे तिकिटासाठी दावा केला आहे. भाजपने त्यांना तिकीट न देण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांना तिकीट नाकारणेही महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे.
मोन्सेरातना पाडण्याचे कॉंंग्रेसकडून प्रयत्न
काँग्रेसच्या तिकिटावर पणजीतून निवडून आल्यानंतर भाजपमध्ये गेलेले बाबूश मोन्सेरात यांना पाडण्यासाठी काँग्रेसने म्हणे व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने उत्पल यांना तिकीट नाकारले तर ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात. अशा स्थितीत पणजीतील एका विशिष्ट समाजाची मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मोन्सेरात यांना पाडण्यासाठी काँग्रेस उत्पल यांना छुपा पाठिंबा देण्याचीही चर्चा सध्या पणजीत रंगू लागली आहे. दुसरीकडे उत्पल यांना आपनेही ऑफर दिली आहे.
वर्ष निवडणूक उमेदवार मते
२०१७ विधानसभा सिध्दार्थ कुंंक़ळ्येकर (भाजप) ७,९२४ बाबूश मोन्सेरात(काँग्रेस) ६,८५५२०१७ पोटनिवडणूक मनोहर पर्रीकर (भाजप) ९,८६२ गिरीश चोडणकर (काँग्रेस) ५,०५०२०१९ पोटनिवडणूक बाबूश मोन्सेरात (काँग्रेस) ८,७४८ सिध्दार्थ कुंंकळ्येकर (भाजप) ६,९९०