लोकमत न्यूज नेटवर्क
पेडणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दोनदा भाजप अध्यक्षपद, मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाने दुसऱ्यांदा धक्का देत मांद्रेची उमेदवारी आमदार दयानंद सोपटे यांना जाहीर केली. त्यानंतर सोपटे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर, माजी मुख्यमंत्री पार्सेकर आणि त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे निवडणुकीत भाजप उमेदवारी ही आपल्यालाच मिळणार, असे सांगत होते. मात्र, भाजपने त्यांच्या पदरात निराशाचे माप टाकले. आमदार सोपटे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन त्यांनी सोपटेंचे अस्तित्व कायम राखण्यास मदत केली आहे. सोपटे यांनी आपली शक्ती मतदारसंघात कायम ठेवली होती. प्रत्येक बैठकीला समर्थकांची लक्षणीय उपस्थिती राहील, याची दक्षता त्यांनी घेतली. त्यातून ज्येष्ठ नेत्यांना दखल घेऊन सोपटे यांना उमेदवारी द्यावी लागली. आता मतदारसंघातील पार्सेकर यांचे समर्थक कोणाच्या बाजूने राहतात, याकडे लक्ष लागून आहे.
मात्र, पार्सेकर यांचे अनेक समर्थक गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या पोटनिवडणुकीत पार्सेकर आणि दीपक कलंगुटकर यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना पाठिंबा दिला होता. यंदा हे समर्थक जीत आरोलकर यांच्यापासून दूर गेल्याने त्यांना मताधिक्य वाढवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
दरम्यान, पक्षाने नव्हे तर काही व्यक्तींनी आपले तिकीट कापल्याचे पार्सेकर यावेळी म्हणाले. मांद्रे मतदारसंघात पाच वर्षे आमदार सोपटे यांचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप पार्सेकर यांनी सोपटेंवर केला. आता आम्ही मागून नव्हे तर सोबत संघटित होऊन निर्णय घेऊ या, असे जाहीर केले.
जाहीरनामा समितीचा राजीनामा
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांची गुरुवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पार्सेकर यांनी ही निवडणूक वेळप्रसंगी अपक्ष म्हणून लढवावी, असा आग्रह धरला. पक्षाने पार्सेकर यांच्यावर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली. ‘आपण येत्या तीन दिवसांत निर्णय घेणार आहे. तोपर्यंत भाजपच्या जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे’, असे पार्सेकर यांनी सांगितले.