लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : ‘नव्या विधानसभेत मीच सर्वात ज्येष्ठ आमदार ठरणार’, असे विधान गेल्याच आठवड्यात केलेले माविन गुदिन्हो यांनी भाजप सत्तेवर आल्यास प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री बनणार असे जे सांगितले जात आहे ते अर्धसत्य असल्याचा दावा केला आहे.
माविन म्हणाले की, केंद्रीय संसदीय मंडळाने अजून तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद ही कायम व्यवस्था नसते. निवडून येणारे आमदार केंद्रीय संसदीय मंडळाच्या सल्लामसलतीने मुख्यमंत्री कोण हे ठरवित असतात.
माविन म्हणाले की, मुख्यमंत्री कोण हा पर्याय अजून खुला आहे. २५ ते २६ आमदार निवडून आल्यास सावंत मुख्यमंत्री होतीलही कोणी सांगावे? मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद हाती घेतलेले प्रमोद सावंत यांनी गेल्या अडीच वर्षात अत्यंत चांगली कामगिरी केल्याची पक्ष प्रभारी तसेच भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी सावंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असताना माविन यांनी मात्र सावंत यांना सुधारण्यास बराच वाव असल्याचे आणखी एक विधान केले आहे. सावंत यांच्यात बरीच सुधारणा व्हायला हवी, असे ते म्हणाले.
माविन यांनी गेल्याच आठवड्यात जाहीर सभेत, आता काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे राजकारणातून निवृत्त झाले, त्यामुळे नव्या विधानसभेत मीच सर्वात ज्येष्ठ आमदार असणार आहे, असे म्हटले होते. सातव्यांदा आपण निवडणूक लढवित आहे आणि यावेळीही निवडून येणार असा दावा त्यांनी केला होता.माविन यांना काही महिन्यांपूर्वी सावंत मंत्रिमंडळात बढती देण्यात आली होती. मंत्रिमंडळात ते चौथ्या क्रमांकावर होते.