लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : ‘गोव्यात भाजप विरोधकांची कथित महाआघाडीसाठी चालू असलेली धडपड म्हणजे बुडणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन बचावासाठी चालविलेल प्रयत्न’ अशा शब्दात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी महाआघाडीची खिल्ली उडविली. ‘भाजप प्रबळ असल्याचीही त्यांची कबुलीच आहे’ असेही ते म्हणाले.
भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात केवळ भाजपच सत्तेवर येणार याबद्दल विरोधकांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच सर्व विरोधक घाबरून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. महागठबंधन किंवा महाआघाडी हा तसलाच प्रकार आहे’ असे ते म्हणाले.
कुठ्ठाळी मतदारसंघात माविन यांचे समर्थक गिरीश पिल्ले यांच्या नावाचा उमेदवारीसाठी करण्यात आलेल्या शिफारशीविषयी त्या उमेदवाराच्या गोंयकारपणाबद्दल प्रश्न केला असता ते म्हणाले की, ‘गोव्यात बाहेरचा आणि आतील असा फरक करता येणार नाही. पिल्ले यांचे कुुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राहते. कायद्याने ते गोमंतकीय आहेत’ असे गुदिन्हो म्हणाले.
पिल्ले यांच्यावर बिगर गोमंतकीयत्वाचा स्टम्प लावतानाच ‘पश्चिम बंगालहून गोव्यात येणाऱ्या लोकांविषयी तुम्ही काय म्हणाल?’ असा प्रतिप्रश्नही त्यांनी पत्रकारांना केला. ‘गोव्यात बंगालचा तृणमूल काँग्रेस पक्ष वेगळीच संस्कृती निर्माण करू पाहत आहे’ असा आरोपही त्यांनी केला.
गोव्यात खरा विकास हा भाजप सरकारनेच केला असल्याचा दावा मंत्र्यांनी केला. राज्यात सार्वजनिक वाहतूक सेवेबाबत अजून बरीच सुधारणा होण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कदंब बसगाड्या या सरकारने खरेदी करून जनतेला दिलासा दिल्याचे गुदिन्हो म्हणाले.