पणजी: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया (Goa Election 2022) पार पाडली असून, १० मार्च रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अवघ्या काही तासांनी मतदारांनी नेमक्या कुणाच्या पारड्यात कौल टाकलाय ते समजेल. तत्पूर्वी अनेकविध वृत्तवाहिन्या तसेच संस्थांनी निवडणूकपूर्व अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोलवर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया देत गोव्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात, हे एक्झिट पोल खोटे आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गोव्यात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. १० मार्चला निकाल भाजपच्या बाजूने येईल, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. भाजपची काँग्रेसशी थेट स्पर्धा आहे. काँग्रेसच्या मनात नेहमीच भीती असते. यावेळी त्यांनी ज्याप्रकारचे उमेदवार निवडले आहेत, ते पाहता कुठेतरी त्यांना असे वाटले असेल की, ते पुन्हा पळून जाऊ नये. काँग्रेसने सध्या रिसॉर्ट राजकारण सुरु केल्याची टीका प्रमोद सावंत यांनी केली आहे.
प्रमोद सावंत दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीला
प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. याबाबत त्यांनी ट्विटही केले. गोव्यात भाजपच्या दमदार कामगिरीची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत राहू, असे प्रमोद सावंत यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. भाजप सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला तर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे समर्थन मागण्यासंदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आधीपासूनच चर्चा करत आहे.
दरम्यान, एक्झिट पोलनुसार, गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसून येत आहे. एक्झिट पोलमध्ये गोव्यातील ४० जागांपैकी भाजपला १३ ते १७ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणुकीचे निकाल असेच राहिले तर तृणमूल काँग्रेस गोव्यात किंगमेकर ठरु शकते. कारण एक्झिट पोलमध्ये टीएमसीला ५ ते ९ जागा मिळतील, असे दाखवण्यात आले आहे. तर इतरांना २ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.