यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा :राजकारणात चांगले लोक यावेत व समाजाचे कल्याण व्हावे या उद्देशाने काही मित्रांनी कोणताच स्वार्थ, अपेक्षा न बाळगता स्व-खर्चाने मला राजकारणात आणले. मला पाठबळ देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मित्रांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मी आज एवढी वर्षे राजकारणात काम करू शकलो. १९८४ साली प्रथमच लढवलेल्या निवडणुकीत केवळ ९४ हजार रुपये खर्च करून मी निवडून आलो होतो. मात्र, यातील ६० टक्के खर्च माझ्या मित्रपरिवाराने उचलला होता, अशी आठवण राज्याच्या राजकारणात गेल्या ३६ वर्षांपासून कार्यरत ज्येष्ठ नेते सुभाष शिरोडकर यांनी सांगितली.
शिरोडा मतदारसंघामध्ये १९८४ पासून सुभाष शिरोडकर राजकारणात आहे. आपल्या पहिल्या निवडणुकीची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘समाजाचे कल्याण करायचे असल्यास राजकारणात चांगली व्यक्ती उतरण्याची गरज आहे, या उद्देशाने काही मित्रांनी मला राजकारणात उतरवण्यासाठी पाठबळ दिले. बाबुली सहकारी या मित्राने केवळ आर्थिक पाठबळच न देता निवडणुकीत प्रचारासाठी फिरण्यासाठी स्वतःची ॲम्बेसिडर कार दिली. तसेच एका मित्राने प्रचारासाठी टेम्पो उपलब्ध करून दिला. पूर्वी राजकारणातील कार्यकर्ते निष्ठावान तसेच माणुसकी जपणारे असायचे. कोणतीही अपेक्षा किंवा स्वार्थ न बाळगता उमेदवारांना विजयी करून आणण्यासाठी रात्रंदिवस काम करत असत.’
‘त्या काळी कार्यकर्ते दिवसभर निवडणुकीनिमित्त उपाशीपोटी फिरत असायचे. मात्र यासाठी त्यांची कोणतीही तक्रार किंवा अट नसायची. काही कार्यकर्ते भागात कोणत्या घडामोडी आहेत, वातावरण कसे आहे, याविषयीही येऊन माहिती देत’ अशी आठवण शिरोडकर यांनी सांगितले.