मडगाव : गेल्या तीन दशकांपासून मी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या राजकीय कारकिर्दीच्या काळात खूप जनसेवा केली आहे. सध्या मी वयाची ७२ वर्षे ओलांडली असून, आता खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. २०२२ची विधानसभा निवडणूक लढविणे ही शेवटची इच्छा आहे, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
राजकारणात मी कधीच स्वार्थ बघितलेला नाही. कुटुंबीयासाठी राजकारण केलेले नाही. जनसेवेसाठी राजकारण केले आहे. मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले. देशात भाजपच्या सरकारला कोणीही अडथळा नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता दीदी त्यांना योग्य धडा शिकवू शकतात. तृणमूल काँग्रेसने जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या योजनांतून राज्यातील लोकांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी मी तृणमूल काँग्रेसमधून शेवटची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांचे कुटुंबाचे राजकारण नाही का?
देशात काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मुंबईत उद्धव ठाकरे, दक्षिणेत करुणानिधी या सर्वांनी आपल्या कुटुंबीयांना राजकारणात उतरविले आहेत. राज्यात प्रतापसिंग राणे, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, डिलायला लोबो, बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर हे सर्वजण कौटुंबिक राजकारण करीत आहेत. मग आमचे कुटुंबीय राजकारणात उतरले, तर त्यांच्यावर कौटुंबिक राजकारणाचा लोक ठपका का ठेवतात? इतर राजकारण्यांवर असा ठपका का ठेवला जात नाही? असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.