Goa Election 2022: “निर्णायक मतदान झालेय, सत्ताधाऱ्यांविरोधी नाराजीच्या लाटेने गोव्यात भाजपचे पानिपत नक्की”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:01 PM2022-02-15T15:01:41+5:302022-02-15T15:04:41+5:30
Goa Election 2022: सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून, काँग्रेसलाच गोव्यात बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
पणजी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात यंदाची विधासभेची (Goa Election 2022) निवडणूक चांगलीच रंगली. १४ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने आता गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलणार की राज्यात सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यातच आता गोव्यात निर्णायक मतदान झाले आहे. याचा फायदा काँग्रेसलाच मिळणार असून, भाजपचे पानिपत नक्की आहे, असा दावा करण्यात आला आहे.
निर्णायक मत देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे आले असून त्याची प्रचिती निकालात दिसून येईल. सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. मला वाटते की, काँग्रेससाठी हा चांगला निकाल असणार असून बहुमत मिळेल. तळागाळाला काम कऱणारे आमचे लोकही हेच सांगत आहे, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली मते व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट
मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट दिसत आहे. आपण निवडणुकीत पराभूत होणार हे माहिती असल्यानेच ते दारोदारी जाऊन प्रचार करत होते. त्यांच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होणे आमच्यासाठी चांगले आहे. आमचा उमेदवार विजयी होईल. गोव्यातील लोकांना स्थिर सरकार हवे असून बहुमताने सरकार निवडून आणायचे आहे. राज्यातील आयाराम गयाराम राजकारण त्यांना बदलायचे असून एक शांत वादळ निर्माण होत होते. आम्हाला २० पेक्षा जास्त जागा मिळतील आणि भाजपा एक आकडी संख्याही पार करुन शकणार नाही, असा दावा राव यांनी केला.
दरम्यान, गोव्यामधील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोव्यामध्ये ७८ टक्के मतदान झाले. तर उत्तर गोव्यामध्ये ७९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ८९.६१ टक्के मतदान हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले. गोव्यात सर्वात कमी ७०.२ टक्के मतदान हे बाणेली मतदारसंघात झाले. या मोठ्या प्रमाणावरील मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.