Goa Election 2022: “तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:55 AM2022-01-24T09:55:08+5:302022-01-24T09:55:52+5:30
Goa Election 2022: काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून, भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी :काँग्रेसने पर्येंत याआधीच प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल.’
काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येंत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
काॅंग्रेसच्या उमेदवारांनी शनिवारी पक्ष सोडणार नाही, अशी जी शपथ घेतली त्याबद्दल विचारले असता चिदंबरम् म्हणाले की, ‘याआधीचा पक्षांतराचा इतिहास पाहता उमेदवारांकडून शपथ घेणे गरजेचे होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा. आम्हाला राज्यात सरकार स्थापन करता यावे, म्हणून सर्व उमेदवारांकडून आम्ही शपथ घेतली.’
दरम्यान, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाने येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यावेळी चिदंबरम्, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर उपस्थित होते.
‘भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या पक्षाने नेहमीच गोव्यातील लोकांसाठी काम केले आहे. भाजपच्या राजवटीत जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे. राज्यात बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात आले पाहिजे, यासाठी काँग्रेसकडे मागणी केली असल्याचे वारखंडकर म्हणाले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘या पक्षाचे मांद्रे, पेडणे, थिवी आणि हळदोण मतदारसंघात सक्रिय सदस्य आहेत. जे काँग्रेसला जिंकण्यास मदत करतील.’
तृणमूलने आमचे नेते पळविले
तृणमूलकडून येत्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव होता. परंतु, एकीकडे पक्षाने हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले. हे योग्य नव्हे, असे चिदंबरम् एका प्रश्नावर म्हणाले.