Goa Election 2022: “गोवेकरांच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, फक्त सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय”: प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:32 PM2022-02-07T18:32:02+5:302022-02-07T18:32:51+5:30
Goa Election 2022: गोवेकरांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता प्रचाराला वेग आला आहे. अनेकविध पक्षांचे स्टार प्रचारक गोव्यात जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गोव्यात पोहोचल्या असून, घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. गोवेकरांच्या भविष्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
काहीही करून सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय आहे. उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठीच तिन्ही प्रकल्प लोकांवर लादले. राज्याबाहेरील पक्ष स्वार्थासाठी गोव्यात आले आहेत. लोकांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी गोवेकरांना दिले. यावेळी प्रियंका गांधी यांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.
गोव्यात सर्वाधिक बेरोजगारी
दक्षिण गोव्यातील नुवे येथे एका कार्यक्रमात प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. गोवा पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर राज्य आहे. परंतु, गेल्या दोन दशकांपासून भाजप सरकारने या प्रदेशाला अधोगतीकडे नेत लोकांना बेरोजगार बनवले आहे. आता राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व प्रथम बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारासाठी ५ हजार कोटींची तरतूद करू, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी केले. याशिवाय प्रियंका गांधी नावेली, सांताक्रूझ, कुंभारजुवे आणि पणजी येथे भेटी देणार असल्याचे सांगितले जात आहे.
...तर गोव्याचा विकास आणखी पाच वर्षे मागे जाणार
गोव्यासह देशभरात महामारीचे संकट सुरू आहे. राज्यात या संकट काळात भाजप सरकारने सामान्य जनतेला मदत न करता लुटण्याचे काम केले. सर्वसामान्यांचे हीत जपण्यास भाजपचे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. मात्र बड्या उद्योजकांना परिपूर्ण सरकार्य व मदत केली आहे. कोळसा हब, लिनियर प्रकल्प, रेल्वेचे दुपदरीकरण हे सर्व प्रकल्प सुरू करून बड्या उद्योजकांना मोठी मदत केलेली आहे. पुरातन वास्तू वारसा हक्काची विल्हेवाट, भूमिपुत्र विधेयक अंमलात आणून लोकांवर अन्याय केलेला आहे. तसेच नोकऱ्या देण्यात अवाढव्य घोटाळा केलेला आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास गोव्याचा विकास आणखी पाच वर्षे मागे जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
पेट्रोल ८० रुपये करणार
भाजपचे सरकार घोटाळेबाज असून नोकऱ्यांमध्ये मोठा घोटाळा केलेला आहे. तसेच वाढत्या महागाईने लोकांना पंताला पोहचविले आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणली जाणार असून पेट्रोल ८० रुपये लिटर केले जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही गोव्याला भेट दिली होती. आम्ही सत्तेत आल्यास गोव्याच्या लोकांसाठी न्याय योजना आणू. याअंतर्गत दर महिन्याला गोव्यातील सर्वात गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात ६ हजार रुपये टाकले जातील. यानुसार वर्षाला ७२ हजार रुपये तुमच्या खात्यात येतील, असे आश्वासन राहुल गांधींनी गोवेकरांना दिले.