लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या हितासाठी लढत आहे की भाजपला मदत करण्यासाठी यावर त्यांनी पुन्हा विचार करावा. तृणमूल काँग्रेसने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली. गोव्यातील भाजप सरकारवर टीका करताना सुरजेवाला यांनी गोव्यात डबल इंजिन नाही तर ट्रबल इंजिन सरकार आहे असे विधान केले.
पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आम आदमी पक्ष आणि भाजपवर निशाणा साधला. सुरजेवाल म्हणाले की, गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कोरोना भ्रष्टाचार उघड केला होता तेव्हा त्यांची बदली करण्यात आली. खाण व्यवसाय सुरू करणार अशी आश्वासने वारंवार भाजपने दिली आहेत. अद्याप खाण व्यवसाय सुरू झालेला नाही. भाजप सरकार गोव्याला कोळसा हब करू पाहतोय.
या सरकारने मच्छिमार इंडस्ट्री, लहान उद्योग, जैवविविधता, पारंपरिक व्यवसाय हे सर्व नष्ट केले आहे. राज्यात सर्व घटकातील लोकांना वारंवार आंदोलने करावी लागली. टॅक्सी, अंगणवाडी, खाण व्यवसायावर अवलंबित यांना आंदोलन करणे भाग पाडले. गेल्या पाच वर्षात सरकारने लोकांवर केवळ अन्याय केला आहे.
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. केजरीवाल सरकारने अकरा हजार कोटी फक्त जाहिरातीवर खर्च केले आहेत. हे पैसे कुठून येतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता अलका लांबा तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.