Goa Election 2022: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रंगत; गोव्यात अपक्ष उमेदवारीने उत्सुकता, हॅट्रटिक होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:40 PM2022-02-03T16:40:03+5:302022-02-03T16:41:17+5:30
Goa Election 2022: गोवा काँग्रेसला बालेकिल्ल्यातील लढत सोपी ठरणार नाही, असे सांगितले जात आहे.
सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कुडतरी मतदारसंघात या खेपेला रंगतदार लढत होणार आहे. मतदारसंघात विजयाची हॅट्रटिक साधलेल्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना या खेपेला अपक्ष म्हणून येथील उमेदवार स्वीकारतील, यावेळीही हे मतदार काँग्रेसच्या बाजूनेच उभे राहतील, याचे उत्तर नंतरच मिळेल. मात्र, सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.
पूर्वी कुडतरी मतदारसंघ युनायटेड गोवन्स पार्टीचा बालेकिल्ला होता. १९७७च्या निवडणुकीत काँग्रेसने त्याला खिंडार पाडले. फ्रान्सिस सार्दिन हे त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. नंतर सार्दिन यांनी मागे वळून बघितलेच नाही. ओळीने चार विधानसभा निवडणुकीत ते येथून आमदार बनले. १९९४च्या निवडणुकीत मात्र त्यांना अनपेक्षितरित्या पराभव पत्कारावा लागला होता. युगोडेपाच्या आंतोन गावकर यांनी त्यांचा पराभव केला. नंतर १९९९च्या निवडणुकीत सार्दीन यांनी आपल्या पराभवाचे उट्टे काढताना गावकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. २००२ मध्येही सार्दीन हेच निवडून आले.
मात्र २००७च्या निवडणुकीत सेव्ह गोवा फ्रन्टचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी त्यांचा पराभव केला. नंतर २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत लॉरेन्स यांनी आपली विजयाची पताका कायम ठेवली. आताही काँग्रेस पक्षाने आलेक्स लॉरेन्स यांनाच उमेदवारी घोषित केली होती. मात्र, अचानक त्यांनी आमदारकीचा रजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अवघ्या २७ दिवसानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षालाही गुडबाय केले. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.
आलेक्स लॉरेन्स यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. मात्र, मतदार त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून कितपत स्वीकारतील हेही बघावे लागेल. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य मोरेन रिबेलो यांना मिळाली आहे. त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. फ्रान्सिस सार्दिन यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. ते मोरेन यांच्यासाठी कितपत काम करतात, हेही प्रश्नचिन्ह आहे. सार्दिन यांचा पुत्र शॅलोम हा कुडतरीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा दावेदार होता. शॅलोमला उमेदवारी मिळवून देण्यासाठी सार्दिन यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे सार्दीन आतून दुखावले आहेत.
आम आदमी पार्टीचे डॉम्निक गावकर हेही तुल्यबळ उमेदवार आहेत. राय, राशोल, कामुर्ली आदी पंचायतींवर त्यांचे वर्चस्व आहे. ते एसटी समाजाचे आहेत. या समाजाचे कुडतरी मतदारसंघात प्राबल्य आहे. भाजपनेही याच समाजाचा अँथनी बार्बोझ यांना उमेदवारी दिली आहे. कुडतरीत भाजपला स्थान नाही. मात्र, पक्षाने ख्रिश्चन धर्मातील एसटी समाजाचा उमेदवार दिल्याने व आता या मतदारसंघातील काही भागांमध्ये हिंदू मतदारांचीही संख्या वाढत असल्याने भाजपला विजयाची आशा वाटत आहे. तृणमूल काँग्रेसने अँथनी पिशोत, तर रुबेन पेरेरा यांना आरजीने उमेदवारी दिली आहे.