लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : विधानसभा निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध लढणारे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांना पाहत होते, ते माजी महापौर उदय मडकईकर यांना काॅंग्रेसने डावलल्यानंतर त्यांनी उत्पल पर्रीकर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी ते याविषयी अधिकृत घोषणाही करणार आहेत.
पणजी मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार म्हणून जोरदार प्रचार केलेले मडकईकर यांना ऐनवेळी काॅंग्रेसने उमेदवारी डावलली. त्यांच्या जागी एल्विस गोम्स यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले मडकईकर यांनी काॅंग्रेसवर बाबूश यांच्यासाठी तिकीट फिक्सींग केल्याचे जोरदार आरोप केले होते. यानंतर ते पुढील भूमिका काय घेतील, याकडे लोकांचे लक्ष लागून होते. या दरम्यान उत्पल पर्रीकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सहकार्य मागितले होते. कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु, शनिवारी निर्णय होऊ शकला नाही. आता रविवारी सकाळी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी उत्पल पर्रीकर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवारी ते त्याची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत.
दरम्यान, भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केलेल्या उत्पल यांनी उदय मडकईकर यांची शनिवारी भेट घेऊन आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. काँग्रेसने उदय यांना डावलून एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची उदय यांची तयारी नाही. एकतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे किंवा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत.
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याबाबत उत्पल ठाम आहेत. ते वेगवेगळ्या घटकांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी उदय यांची घेतलेली भेट याच रणनीतीचा भाग होता. दरम्यान, उदय मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आम्हा दोघांची सकारात्मक बोलणी झालेली आहे; परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नंतरच योग्य तो निर्णय घेणार आहे. आज लवकरच मी माझा निर्णय जाहीर करीन.’