Goa Election 2022: काँग्रेसच्या उदय मडकईकरांची उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्याची घोषणा; पणजीत प्रचारही करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:05 PM2022-01-25T18:05:23+5:302022-01-25T18:06:03+5:30
Goa Election 2022: प्रशांत किशोरांनी टीएमसीतून निवडून आणण्याची हमी देऊनही भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देत असल्याचे उदय मडकईकर म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी: काँग्रेसचे पणजीची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले महानगरपालिकेचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रिकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली.
उत्पल पर्रिकर हे पणजीची निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पल यांना पाठिंबा देतानाच त्यांच्यासोबत प्रचारातसुद्धा सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मडकईकर म्हणाले की, उत्पल यांना निवडणुकीत पाठिंबा द्यावा की तृणमूल काँग्रेसची ऑफर स्वीकारून त्यांच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवावी, असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता. मात्र, त्यापैकी उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून घेतला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणे हा उद्देश ठेवूनच उत्पल यांना पाठिंबा दर्शवला आहे. जर मी अपक्ष किंवा अन्य पक्षांतर्फे निवडणूक लढवली, तर मतांचे विभाजन होईल, जे अयोग्य ठरणार आहे. भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना निवडणुकीत केवळ उत्पलच टक्कर देऊ शकतात. ते नक्कीच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसने पक्षात येण्यासाठी चांगली ऑफर दिली होती. टीएमसीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी तशी आपल्याशी चर्चासुद्धा केली होती. तर दुसरीकडे पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आपल्याला निवडणुकीत जिंकून आणू अशी हमीसुद्धा दिली. मात्र, माझ्या टीएमसी प्रवेशाला अनेक कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मी ही ऑफर स्वीकारली नाही, असे उदय मडकईकर यांनी सांगितले.
दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी माजी महापौर तथा विद्यामान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फुर्तादो हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, तेसुद्धा काँग्रेसतर्फे पणजीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. उत्पल यांनी त्यांच्याकडेही पाठिंब्याची मागणी केली आहे.
बाबूश-एल्विस यांची सेटिंग
बाबूश मोन्सेरात यांच्यासोबत सेटिंग करूनच काँग्रेसने एल्विस गोम्स यांना पणजीची उमेदवारी दिली आहे. याचा पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करीत आहे, असे मडकईकर म्हणाले. उत्पल यांच्यावर उमेदवारीबाबत अन्याय झाल्यानेच त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही, यावर आपला विश्वास आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पक्ष बाबूश मोन्सेरात यांनी विकत घेतला आहे, असा आरोप मडकईकर यांनी केला.
टोनींची साथ सोडणार नाही
पणजीची उमेदवारी न दिल्याने आपण काँग्रेसवर नाराज झालो असो तरी टोनी रॉड्रिग्स यांना माझा पाठिंबा आहे. त्यांच्या प्रचारातसुद्धा मी सहभागी होईन. टोनी माझे मित्र असून, शेवटच्या क्षणी मी त्यांची साथ सोडणार नाही. माझा घात काँग्रेसने नाही, तर काँग्रेस नेत्यांनी केला आहे, असे उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले.