लोकमत न्यूज नेटवर्क
केपे : भाजप सरकार हे खोटारडेपणाचे फोटिंगपानाचे सरकार असून, भाजपने आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी केला. गेल्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्री मला टाळत होते, असेही ते म्हणाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेवेळी उपस्थित सरपंच, पंच सदस्य आणि माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
‘मला उमेदवारी दिली जाणार नाही याचा अंदाज दीड वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेण्यासाठी मी वेळ घेण्याचा प्रयत्न केला, तर ते टाळाटाळ करायचे’, असे पावसकर यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले.
पाऊसकर म्हणाले, ‘आज भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सावर्डे मतदारसंघातील दोन्ही जिल्हा पंचायत सदस्यांविरुद्ध काम केले; पण या गोष्टी पक्षाने नजरेआड केल्या आहेत. २०१९ पासून आम्ही सावर्डे मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन भाजपसाठी काम केले. आज जो निर्णय झाला, तो माझ्यासह कार्यकर्त्यांच्या विरोधातही आहे. आम्ही गप्प बसणार नाही. अपक्ष म्हणून निवडणुका लढवणार आहे. या निर्णयाला कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मला बळ मिळाले. मला मतदारसंघाचा विस्तार आणि विकास करायचा आहे.’
दरम्यान, यावेळी पाऊसकर म्हणाले, ‘जे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्यासमोर उमेदवारीचे दोन पर्याय ठेवले आहेत. त्यात मी आणि सावर्डे पंचायतीचा सरपंच असलेला भाऊ यापैकी एकाची उमेदवारी असेल. तोच सावर्डे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढेल.’
दरम्यान, संदीप पाऊसकर यांनी उमेदवारीबद्दल आमचे कार्यकर्ते, समर्थक निर्णय घेतील. जो कार्यकर्त्यांचा निर्णय असेल तोच आपला निर्णय असेल, असे सांगितले. ‘भाजपमधील ६० टक्के कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत’, असे बावस्कर यांनी सांगितले. सात पंचायतींमधील कार्यकर्ते, पंच सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला.
मला मुक्तपणे काम करू दिले नाही... मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. ‘मतदारसंघात जी विकासाची आणि विस्ताराची कामे अर्धवट स्थितीत आहेत, त्याला जबाबदार भाजप सरकार आहे. त्यांनी मला कधीही मुक्तपणे काम करायला दिले नाही. अडथळे आणण्याचा प्रयत्न केला’, असे पाऊसकर म्हणाले.