पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय होता, तो म्हणजे भाजपकडून उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना उमेदवारी मिळणार की नाही. मात्र, पणजीतून भाजपने उत्पल पर्रिकर यांची उमेदवारी नाकारली. यानंतर आता उत्पल पर्रिकर कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच उत्पल पर्रिकर यांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही, असे भाजप नेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टपणे सांगितले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंबीय भाजपचाच एक भाग आहेत. भाजप त्यांना आपलेच कुटुंब मानतो. मात्र, उत्पल पर्रिकर यांना आताच्या घडीला पणजीतून उमेदवारी मिळणे शक्य नाही. उत्पल पर्रिकर यांना डिचोलीतून तसेच भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. पर्रिकरांना पाच वर्षांनंतर पुन्हा पणजीत आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उत्पल पर्रिकरांसोबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी
उत्पल पर्रिकर यांच्यासोबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच तृणमूल काँग्रेससारखे आम्ही कुणालाही खरेदी करणार नाही. तृणमूल काँग्रेस हिंदूविरोधी आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत हेच चित्र समोर आले, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. याशिवाय गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्हांला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.