लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने नाराज झालेल्या दिलीप परुळेकर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे साळगावचे उमेदवार जयेश साळगावकर यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत परुळेकर यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.
तानावडे म्हणाले की, नाराज बनल्यानंतर परुळेकर यांनी भाजप सोडला नाही. पक्षासोबतच ते राहिले. निवडणुकीत तिकीट मिळणेच सर्व काही नाही. ते अनेक वर्षे पक्षासोबत होते व त्यांनी पक्षाचे काम केले. प्रामाणिकपणे जो पक्षाचे काम करतो त्याचा पक्ष नेहमीच सन्मान करतो. पक्षासाठी ते नेहमीच काम करीत राहतील. निवडणुकीत मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परुळेकर म्हणाले की, भाजप पक्षाने आपल्याला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, यासाठी त्यांचे आभार. पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली ती निश्चितच आपण प्रामाणिकपणे पार पाडू. मध्यंतरी आपण नाराज झालो असलो तरी अन्य पक्षांत जाण्याचा विचार आपण कधीही मनात आणला नाही. निवडणुकीत भाजपसाठी साळगाव मतदारसंघात काम करू. कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.