वाळपई : सत्तरीच्या राजकारणात आज वेगळा रंग आला असून ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे यांनी सकाळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचारास सुरुवात केली. पर्येत आता जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे किंवा त्यांच्या पत्नी विजयादेवी हे आपल्या सुनेविरुद्ध निवडणुकीत उतरणार आहेत. काही दिवस तळ्यातमळ्यात भूमिका घेतलेल्या प्रतापसिंग राणेंची भूमिका यामुळे स्पष्ट झाली आहे.
सोमवारी सकाळी त्यांनी पर्ये येथील श्री भूमिका मंदिर, तसेच केरी श्री आजोबा मंदिर व पर्येतील श्री म्हाळसा देवी मंदिरात जात देवतांचे दर्शन घेतले. प्रतापसिंग राणे यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्येत भाजपतर्फे दिव्या राणे यांना भाजपाचा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राणे कुटुंबासमोर प्रश्न उपस्थित झालाअसून राणे यांनी उमेदवारी दाखल केली तर मात्र सत्तरीच्या इतिहासात प्रथमच सासरे व सून अशी लढत पाहावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापसिंग राणे व विश्वजित राणे यांच्यात शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली होती. त्यामुळे त्या कुटुंबातील अंतर्गत कलह दिसून आला होता. प्रतापसिंग राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे सुद्धा प्रचार शुभारंभ करण्यास उपस्थित होत्या. त्यामुळे राणे यांच्या निवडणुकीत उतरणार असल्याच्या निर्णयास त्यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येते. कदाचित विजयादेवी राणे सुद्धा उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पर्ये मतदारसंघात ज्येष्ठ राणे यांच्या निर्णयाने लक्ष वेधून घेतले असून प्रतापसिंग राणे यांनी सुनेच्या विरोधातच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पर्येत सध्या आपचे विश्वजित कृष्णराव राणे, तुणमूल काँग्रेस पक्षाचे गणपत गांवकर तर शिवसेनेचे गुरुदास गांवकर रिंगणात आहेत. त्यामुळे पर्येत बरीच रंगत होण्याची चिन्हे आहेत.