लोकमत न्यूज नेटवर्क
पेडणे : भारतीय जनता पक्षाचा आपण जड अंत:करणाने निरोप घेतो,’ असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जाहीर केले. ३२ वर्षांनंतर अखेर पार्सेकर यांनी भाजपला रामराम म्हटले व पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडल्याचे जाहीर केले.
कार्यकर्त्यांनी मला मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढण्याची विनंती केली. मी विचार करण्यासाठी दोन वर्षे घेतली. आमचे डिपॉझिट जप्त होत होते तेव्हापासून आम्ही भाजपमध्ये होतो. मी भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीचा यावेळी अध्यक्ष होतो. मी अध्यक्षपदाचा राजीनामा आजच सायंकाळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना पाठवून देत असल्याचे पार्सेकर म्हणाले.
मांद्रे मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक सिटी, पाण्याचा प्रकल्प, रुग्णालय, केरी-तेरेखोल पूल, विमानतळ प्रकल्प व अन्य प्रकल्पांचे काम गतीने पूर्ण व्हायला हवे. मी पुन्हा आमदार बनून या प्रकल्पांना गती देऊ पाहतो. मांद्रे मतदारसंघातील युवकांमध्ये असलेली बेरोजगारीची समस्याही नष्ट करायची आहे. मी आता पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खूप जड अंत:करणाने मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचा पार्सेकर यांनी पुनरुच्चार केला. पार्सेकर यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर करताना समर्थकांनी फटाके वाजवून स्वागत केले.
ज्या पक्षाच्या तिकिटावर पार्सेकर तीनवेळा आमदार झाले, पक्षाने मंत्री आणि मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षपदही दिले, त्याच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देवून त्यांनी पक्षासह समर्थकांनाही जोरदार धक्का दिला. त्यांच्या समर्थकासह जनतेलाही ते पक्ष कधीच सोडणार नाहीत असे वाटत होते.
रंगत वाढणार?
माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यावर भाजपने अन्याय केला असे समर्थकांचे म्हणणे आहे. पार्सेकर यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ३३३ मते मिळाली होती. तेव्हा मतदारसंघात रस्त्यावर पक्षचिन्ह कमळ रंगवायलादेखील कोणीच नव्हते, ते स्वत: कमळ निशाणी रंगवायचे. त्यांची खिल्ली विरोधी पक्षाचे कार्यकर्ते उडवायचे. असा अपमान सहन करत पार्सेकर यांनी पक्ष सावरला. वाढवला. आता त्यांना पक्ष सोडावा लागला असे समर्थकांनी सांगितले. पार्सेकर यांनी पक्ष सोडल्याने जाहीर केल्यानंतर समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
आपल्या हृदयावर दगड ठेवून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ‘मला मंत्री नव्हे तर आमदार होण्याची अपेक्षा आहे. कारण, मी माझ्या कार्यकाळात पेडणे तालुक्यात जनहिताचे प्रकल्प आणले, ते आजही अर्धवट अवस्थेत आहेत. हे प्रकल्प मला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यासाठी मी सरकारमध्येच असले पाहिजे असे नाही. फक्त विधानसभेत या प्रकल्पांसाठी आवाज उठवायची गरज आहे. त्यासाठी मी लढणार आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर
२०१७च्या निवडणुकीत पार्सेकर हे मुख्यमंत्री होते. त्या निवडणुकीत जी मंडळी त्यांच्यासोबत होती, तीच माणसे आजही त्यांच्याभोवती आहेत. त्यामुळे माझ्या विजयावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मला माझ्या विजयाची खात्री आहे.’ - दयानंद सोपटे, आमदार ... गरज नाही
देवेंद्र फडणवीस यांनी माझे मन वळविण्याचे प्रयत्न केले. माझे पुनर्वसन करणार वगैरे बोलले. माझे पुनर्वसन करण्याची गरज नाही, असे पार्सेकर म्हणाले.