पणजी : मांद्रेत भाजपने तिकीट नाकारल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, पार्सेकर यांचे मन वळविण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्याकडे आमची बोलणीही चालू आहेत.’ यावर उत्तर देताना पार्सेकर म्हणाले की, ‘मला आता मुख्यमंत्री किंवा मंत्री बनायचे नाहीये. त्यामुळे पुन्हा भाजपत जाण्याचा प्रश्नच नाही,'
पक्षासाठी आजपावेतो भरपूर काही केले. आता जनतेसाठी करीन. माझ्याशी बोलणी चालू आहेत, असे म्हणणाऱ्यांना ताठ मानेने माझ्याकडे यावे आणि बोलावे. मी अशा दबावांना मुळीच भीक घालणार नाही, असंही त्यांनी यावेळी सुनावलं.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?मांद्रे मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले असल्याची माहिती समोर आली होती. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती देताना सांगितले की, ''पार्सेकर यांच्याशी आमची बोलणी अजून चालूच आहेत. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यात आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.''