Goa Election 2022 : उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधण्याच्या विचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:17 PM2022-01-23T16:17:46+5:302022-01-23T16:18:10+5:30
Goa Election 2022 : यापूर्वी काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा थेट केला होता आरोप.
मडगाव : सध्या गोव्या निवडणुकीचे (Goa Election) वारे वाहू लागले आहेत. बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. परंतु यानंतर अनेकांमध्ये नाराजीचा सूर असून काही नेत्यांनी उमेदवारी नाकारल्याने अन्य पक्षांचीही वाट धरली आहे. बाणावलीत काँग्रेसची (Congress) उमेदवारी अँथनी डायस यांना जाहीर झाल्यानंतर आता माजी मंत्री मिकी पाशेको हे राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर आहेत. पाशेको यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाला गुडबाय करताना काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकल्याचा थेट आरोप केला होता.
पाशेको हे बाणावलीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे त्यांना वाटत होते. पाशेको यांच्याशी संपर्क साधला असता, आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
उपलब्ध माहितीनुसार पाशेको हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रावादी काँग्रेसमधून त्यांना बाणावली किंवा नुवे मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघातून यापूर्वी पाशेको हे आमदार होते.