Goa Election 2022: तेव्हा पक्षाकडून सर्व खर्च केला जायचा: माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:39 AM2022-01-20T09:39:35+5:302022-01-20T09:40:30+5:30
Goa Election 2022: सन १९७७ च्या निवडणुकीवेळी साधारणत: ६,५०० रुपये खर्च केला होता, असे रमाकांत खलप यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा : ‘मी लढवलेली पहिली निवडणूक आणि आताची निवडणुक यात तुलना होणे योग्य ठरणार नाही. पण, १९७७च्या निवडणुकीवेळी मी साधारणत: ६,५०० रुपये खर्च केला होता. त्या काळात निवडणुकीतील बहुतांश खर्च पक्षाकडून केला जायचा,’ अशी माहिती खलप यांनी दिली.
खलप म्हणाले, ‘त्यावेळचे प्रचारकार्य लोकाभिमुख आणि केलेल्या कामाची माहिती देणारे असायचे. प्रचारासाठी सोबत असणारे कार्यकर्ते बहुतेक खर्च स्वत: करीत होते. जेवणाची तसेच इतर सोय कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यामुळे प्रचारावर होणारा खर्च बघायला गेले तर भाड्याने घेतलेल्या वाहनांवरच होत होता.’
‘प्रचारासाठी खुल्या पिकअकचा वापर केला जायचा. प्रचारासाठी सोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी पैसे घ्यावे लागले नव्हते. तसेच त्यावेळी कार्यकर्त्यांनीही कसल्याच प्रकारची मागणीसुद्धा केली नाही. ते स्वत:हून राबायचे’ असे खलप म्हणाले.
‘मात्र, त्यावेळी झालेल्या खर्चाची व आताच्या खर्चाची तुलना करणे योग्य ठरणार नाही. कारण त्यावेळचे कार्यकर्ते तत्त्वनिष्ठ असायचे. आपल्या उमेदवाराला त्रास होऊ न देता मान-सन्मानाने खांद्यावर घेऊन फिरायचे. आज परिस्थिती विपरीत झाली आहे. उमेदवाराला कार्यकर्त्यांना घेऊन फिरणे भाग पडते. त्यातही विविध लॉबी निवडणुकीसाठी परिणाम करणारी ठरत आहे’ असे खलप यांनी सांगितले.