Goa Election 2022: गोव्यात असाही अजब रेकॉर्ड! गत ५ वर्षांत विधानसभेतील ४० पैकी २४ आमदारांनी सोडले पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:26 AM2022-01-16T11:26:27+5:302022-01-16T11:28:32+5:30
Goa Election 2022: गेल्या ५ वर्षांत केवळ काँग्रेसच्या नाही तर भाजपच्याही काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षांत प्रवेश केला.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. तिकिट वाटपावरून भाजपचे टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. निवडणुकीसाठी यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकरही भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता गोवा विधानसभेत अजब रेकॉर्ड समोर आला आहे. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत ४० पैकी तब्बल २४ आमदारांनी पक्ष सोडला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळूनही त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपने मोठी राजकीय खेळी करून सत्ता स्थापन केली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा गोव्यात पाचारण करून पक्षाने सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त करून घेतला. मात्र, त्यानंतर काँग्रेस आणि अन्य पक्षांमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झाले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतरही भाजपमध्ये आमदरांचे इन्कमिंग सुरूच राहिले.
विश्वजित राणे यांच्यापासून विरोधी पक्षापर्यंत पक्ष सोडले
मनोहर पर्रिकर यांनी विश्वासदर्शक ठराव सादर करतेवेळी माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांचे पुत्र विश्वजित राणे यांनी सभागृहातून वॉकआऊट केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले होते. यानंतर वर्षभरातच दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातही फूट पडल्याचे पाहायला मिळाले. मगोपच्या ३ पैकी २ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पैकी मनोहर बाबू आजगांवकर यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले चंद्रकांत कवळेकर यांनीही पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला.
तृणमूल काँग्रेसचा गोव्यात प्रवेश
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली, ती काँग्रेसने जिंकली. मात्र, त्या जागेवर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांनी आपली पत्नी आणि ८ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेस नेते रवी नाईक आणि फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही पक्ष सोडून कमळ हाती धरले. अलीकडेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात एन्ट्री घेतल्यावर राष्ट्रवादीचे काही आमदार तृणमूलमध्ये सामील झाले. यामध्ये केवळ काँग्रेस नाही, तर भाजप नेत्यांनीही पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपच्या अलीना सल्ढाना यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते मायकल लोबो यांनीही पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये सामील झाले. यासह भाजप नेते प्रवीण झांट्ये हेही भाजप सोडून मगोपमध्ये सामील झाले.