Goa Election 2022: “गोवेकरांची काँग्रेसलाच साथ, निवडणुकीत बहुमत प्राप्त करून सत्ता स्थापन करणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:26 PM2022-02-03T16:26:27+5:302022-02-03T16:27:01+5:30
Goa Election 2022: गोव्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : राज्यात काँग्रेस पक्ष बहुमत प्राप्त करणार असून काँग्रेसचा मुख्यमंत्री त्वरित घोषित केला जाईल. सरकार स्थापन होताच तातडीने खाणी सुरू करून २०१२पासून प्रतिकुल परिस्थितीत असलेल्या खाण अवलंबितांना मोठा दिलासा मिळेल. मात्र, राज्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.
मये येथे युतीचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठकीत ते बोलत होते. मये मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी प्रचार केला. यावेळी चोडणकर म्हणाले, गेली अनेक वर्षे खाणी बंद असल्यामुळे बहुजन समाज आर्थिक अडचणीत आहेत. आमची सत्ता आल्यावर खाणी सुरू करून त्यांना न्याय दिला जाईल.
प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने खाणी बंद करून अर्थव्यवस्था व बहुजन समाजाचे कंबरडे मोडले आहे. केवळ निवडणूक आली की भाजप खाणी सुरू करण्याची भाषा करते. मात्र, आता काँग्रेसला जनतेची साथ मिळाली आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर खाणी सुरू करू, असे चोडणकर यांनी सांगितले. यावेळी मये मतदारसंघातील विविध गावांमध्ये संतोष सावंत यांचा प्रचार करण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या कोपरा बैठकीस दुर्गादास कामत, संतोष सावंत, धर्मा चोडणकर, विरेंद्र पत्रे व इतर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.