लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. ३१ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात ३०१ जण राहिले असून प्रथमच उमेदवारांची संख्या विक्रमी आहे. काही मतदारसंघांमध्ये थेट तर अनेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत.
शिवोलीत सर्वाधिक १३, मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात १२, नावेली व कुंकळ्ळीत प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये ८ ते ९ उमेदवार आहेत. दरम्यान, आयोगाकडून उमेदवारांना निशाण्या वाटण्याचे काम चालू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.
पणजीत शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी माघार घेऊन अपक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे. भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने ते बंड करुन अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. दुसरीकडे मांद्रेत भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच काणकोणमध्ये उपसभापती इजिदोर फर्र्नांडिस यानी बंडाची भूमिका कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात राहणेच पसंत केले.
भाजपने सर्व ४० मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती असून काँग्रेसने ३७ तर गोवा फॉरवर्डने ३ उमेदवार दिले आहेत. आम आदमी पक्षाने ३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मगोप-तृणमूल युतीनेही ३९ उमेदवार दिले आहेत. युवावर्गाच्या पाठिंब्यावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष प्रथमच रिंगणात आहे. या पक्षाने ३८ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी युतीने २३ तर अन्य लहान पक्षांनी १० मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार दिलेले आहेत.