पणजी: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर वातावरण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांचे स्टार प्रचारक गोव्यात येऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहे. मात्र, केवळ ४० विधानसभा जागांसाठी गोव्यात तब्बल ६३ हून अधिक जणांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षातून बंडखोरी केल्याची माहिती मिळाली आहे. गोवा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर नाराजांची संख्या वाढतच राहिली. गोवा निवडणूक लढवत असलेल्या ७ ते ८ पक्षातून तब्बल ६३ जणांनी पक्षांतर केल्याचे सांगितले जात आहे.
बंडखोरीच्या त्सुनामीचा सर्वाधिक फटक भाजपला बसल्याचे सांगितले जात आहे. भाजपमधून २२ जणांनी पक्षांतर केल्याची माहिती मिळत आहे. यानंतर, काँग्रेस २१, गोव्यात पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत असलेल्या तृणमूल काँग्रेसमधून १७, गोवा फॉरवर्डमधून ५, राष्ट्रवादी काँग्रेसमधून २ जणांनी पक्षांतर केले आहे.
कोणत्या पक्षाने किती जणांना संधी दिली?
अनेकांनी पक्ष सोडलेले असले, तरी यातील काही नेत्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. यातील बहुतांश जण अपक्ष उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. गोव्यात पक्षांतर केलेल्यांपैकी तृणमूल काँग्रेसने सर्वाधिक १७ जणांना पक्षात घेतले. त्यापाठोपाठ काँग्रेसने ८, भाजपने ७, आम आदमी पक्षाने ५, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने प्रत्येकी ४ जणांना पक्षात प्रवेश दिला. या सगळ्या धामधुमीत गोवेकर नेमका कुणाला कौल देणार, याबाबत सर्वच राजकीय विश्लेषकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
प्रचारासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची आयात
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. महाराष्ट्रातून प्रमुख पक्षांचे अनेक नेते प्रचारासाठी गोव्यात आले आहेत. त्यांच्याकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी पक्षाने दिली आहे. मात्र, येथे बुथवर बसायलाही पक्षाचा कार्यकर्ता उपलब्ध नाही. त्यामुळे या नेत्यांपुढे पेच पडला आहे. कोकण, कोल्हापूर, सोलापूर या नजीकच्या भागातून आलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघातून शंभरावर कार्यकर्ते प्रचारासाठी गोव्यात बोलविले आहे.
दरम्यान, गोव्यात काँग्रेसचे तर फारसे नियोजन दिसत नाही. बाहेरून येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीबाबत स्थानिक अपडेट माहितीही दिली जात नसल्याची ओरड आहे. बाहेरून येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या भेटीगाठी, स्वागतासाठी प्रदेश सरचिटणीस किंवा अन्य पदाधिकारी उपस्थित राहत नसल्याची खंत काही नेत्यांनी बोलून दाखविली.