लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा : ‘आता पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही. पक्षांतर करून निघून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, या मतावर आम्ही ठाम राहिलो. आलेक्स रेजिनाल्ड यांचीही आम्ही गय केली नाही’ असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. मडकई मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार लवू मामलेदार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, ‘उमेदवारी जाहीर करण्याबाबतीत आम्ही इतर पक्षांना मागे टाकले आहे. एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुुन्हा संधी न देण्याची भूमिका आम्ही घेतली. जेव्हा रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र भाजपमध्ये जाताच आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना डावलून नवे नेतृत्व उभे केले. राज्यात सध्या काँग्रेसची लाट आली आहे. त्या लाटेच्या जोरावर यावेळी मडकईत बदल नक्कीच घडेल’ असे चोडणकर म्हणाले.
काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार लवू मामलेदार म्हणाले, ‘अख्ख्या राज्याचा दौरा करून मडकईत आल्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधीने हा मतदारसंघ जाणून-बुजून मागास ठेवल्याचे तुमच्या लक्षात येईल. इथे समस्यांचा डोंगर आहे. मतदारांना लाचार करण्यापलीकडे इथल्या आमदाराने काहीच केले नाही.’ प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस त्रिबोल डिसोझा यांचे भाषण झाले. गटाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर यांनी स्वागत केले.