लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रतिनिधीशी बोलताना पार्सेकर यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांकडे चर्चा केल्यानंतर मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच पुढे जायचा निर्णय घेतला आहे. एका पक्षाचा शेला उतरवून ठेवल्यानंतर अन्य पक्षांनी माझ्याशी संपर्क केला; परंतु मला अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरायचे आहे. माझ्या मागे जनमत आहे की नाही किंवा मी किती पाण्यात आहे, हे मलाही पाहायचे आहे. कारण २०१७ मध्ये माझा पराभव झाला, तेव्हा काही स्वकीय माझे जनमत गेले असे म्हणू लागले, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.
‘मांद्रे मतदारसंघात ३३५ मतांपासून मी पक्ष मोठा गेला, परंतु गेल्या पाच वर्षांत जे काही मी पाहिले ते अनपेक्षित होते. मंडल, बूथ समित्यांवर जुन्या, तसेच मूळ कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. काल मी पक्ष सोडल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापले राजीनामे अध्यक्षांकडे पाठवून दिले. मला पक्षाने गृहीत धरले. तिकीट नाही दिले तरी मी कुठेही जाणार नाही, असे पक्ष नेत्यांना वाटले होते. परंतु, त्यांचा अंदाज चुकला, असे पार्सेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेली ३० वर्षे हा पक्ष मी वाढविला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मला पक्ष सोडावा लागला. पक्षाच्या भरवंशावर राहिलो. मला तिकीट मिळेल याची खात्री होती. परंतु, मला डावलण्यात आले आणि जे बेभरवंशाचे होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.