Goa Election 2022: “भाजप नेत्यांकडून सुडाचे राजकारण, राजीनाम्याबाबत शेवटपर्यंत थांबलो”; मायकल लोबोंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:48 AM2022-01-25T09:48:52+5:302022-01-25T09:49:57+5:30
Goa Election 2022: भाजपच्या तिकिटावर न लढण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता, असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजप नेते नेहमी सुडाचे राजकारण करतात. त्यामुळे मी राजीनामा देण्याबाबतीत शेवटपर्यंत थांबलो, असे माजी मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. लोबो म्हणाले की, ‘भाजपच्या तिकिटावर न लढण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. तसेच पत्नी डिलायला हिच्यासाठी मी भाजपकडे कधीही तिकीट मागितले नव्हते. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याबाबत मी अखेरपर्यंत थांबलो. कारण आधीच राजीनामा दिला असता तर भाजपच्या नेत्यांनी माझ्याबाबतीत सुडाचे राजकारण केले असते.’
लोबो पुढे म्हणाले की, ‘भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्री तसेच पक्षाचे आयोजन सचिव धार्मिक पातळीवर फूट पाडण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री कदाचित पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना खूश करण्यासाठी हे करीत असावेत.’ लोबो म्हणाले की, ‘कळंगुट, कांदोळीपट्ट्यातील लोकांचा नेहमीच काँग्रेसकडे कल राहिलेला आहे. २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मी भाजपच्या तिकिटावर निवडून आलो. लोकांनी काम पाहिलेले आहे. नेहमीच स्थानिक व्यावसायिकांना मी हात दिला. भाजपमध्ये सध्या कोणतेच ताळतंत्र राहिलेले नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. भाजप नेते ज्या पद्धतीने वागायला लागले आहेत, ते पाहता आजवर ज्यांनी पक्ष मोठा करण्यासाठी घाम गाळला, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना बाजूला काढले जात आहे, असेच आजवर दिसून आले आहे. त्यामुळे मूळ कार्यकर्ते पक्षापासून बाजूला गेल्याचे दिसते.
लोबो म्हणाले, ‘दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या तत्त्वांना हे नेते हरताळ फासत आहेत. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनाही हीन वागणूक दिली गेली. पक्ष सोडण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. कारण भाजपकडे आता पर्रीकरांची तत्त्वे राहिलेली नाहीत. ते हयात असताना वेगळा अजेंडा होता. आताच्या नेत्यांचा अजेंडा वेगळा आहे. सुडाचे राजकारण करण्याची भाजपची नीती देशभर लोकांना ठावुक आहे. त्यामुळे पक्षाची आजची अवस्था झाली आहे.
माजी मंत्री लोबो म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये तशी नवी सुरुवात असली तरी मी स्थिरावलो आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जे नेहमीच शर्यतीत असायचे, ते आता पक्षात राहिलेले नाहीत.’