पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता मतदानाकडे सर्वपक्षीयांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना संकटामुळे प्रचारसभांवरील निर्बंध वाढले आहेत. यातच गोव्यातील गड राखणे भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर बहुतांश गोष्टी बदलल्या. त्यामुळे भाजप सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे मत भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये सामील झालेल्या एका बड्या नेत्याने व्यक्त केले आहे.
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मायकल लोबो यांनी आपली मते रोखठोक पद्धतीने व्यक्त केली आहेत. गोव्यातील भाजप सरकारची अनेक धोरणे, योजना आणि निर्णय चुकल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
भाजप सोडण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेतला होता
माझ्यासाठी देश सर्वोपरि आहे. माझी पत्नी गेल्या १५ वर्षांपासून गोव्याच्या राजकारणात सक्रीय आहे. मात्र, भाजप सोडण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेतला होता. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. त्यामुळे भाजप सोडण्याशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही, असे सांगत कोळसा धुळीमुळे गोव्यात अनेकांचा मृत्यू झाला. पर्रिकर असताना ९ हजार टन कोळसा वाहतुकीसाठी परवानगी दिली नव्हती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १२ हजार टन कोळसा वाहतुकीसाठी परवानगी दिली. भाजपचे पक्ष व्यवस्थापन फारच बदलले आणि ते मला अजिबात आवडले नाही. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे मायकल लोबो म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेसमध्ये सामील झालात का, यावर बोलताना मायकल लोबो म्हणाले की, आताच्या घडीला काँग्रेसमध्ये मी नवीन आहे. आधी पक्षासाठी काम करू इच्छितो. मुख्यमंत्रीपद हवे, असे आतातरी मनात काही नाही, असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.