पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या गोव्यात आहेत. काँग्रेसचे बंडखोर पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांच्या निवासस्थानी पटोले यांनी भेट दिली, परंतु मडकईकर हे काही त्यांना वश झाले नाहीत.
पणजी मतदारसंघात उदय मडकईकर हे काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक होते. कॉंग्रेसी नेत्यांची आश्वासनावरुन त्यांनी आपला प्रचारही सुरू केला होता. परंतु काँग्रेसने त्यांना अखेरच्या क्षणाला तिकीट नाकारली. त्यानंतर मडकईकर यांनी भाजपचे बंडखोर उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला् उत्पल हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र होत. उत्पल यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मडकईकर यांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसी नेत्यांनी महाराष्ट्रातून पटोले यांना गोव्यात पाठवले. पटोले यांनी मडकईकर यांच्या भाटले येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. परंतु मडकईकर यांनी त्यांना आपण उत्पलना शब्द दिला आहे त्यामुळे आता मी मागे हटणार नाही, असे सांगितले आणि परत पाठवले.
पटोले हे अलीकडे महाराष्ट्रात वादग्रस्त विधाने करीत सुटले आहेत. अलीकडेच त्यांनी 'ज्यांची बायको पळते, त्यांना मोदी म्हणतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात महाराष्ट्रात राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पटोले यांनी याच दरम्यान गोवा गाठला. सध्या ते गोव्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत आणि काँग्रेसी बंडखोरांचे मन वळवण्याच्या कामात गुंतले आहेत.
दरम्यान, उदय मडकईकर यांनी 'लोकमत'ला सांगितले की, 'नाना पटोले हे दुपारी माझ्या घरी आले होते. परंतु मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, मी उत्पल यांना शब्द दिलेला आहे आणि आता मागे हटणार नाही. माझा पाठिंबा काँग्रेसी उमेदवार ऐवजी उत्पल यांनाच असणार आहे.'