लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : जनतेला न्याय केवळ काॅंग्रेस सरकारच देऊ शकते. काॅंग्रेसच गोव्याचा विकास करु शकते, असा विश्वास महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण साखळी भागाचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री तथा भाजपचे साखळीचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येते. यावरुन काॅंग्रेसवर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते, असे त्यांंनी सांगितले.
पटोले म्हणाले की, खाणी बंंद झाल्याने खाण अवलंंबितांंवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांंना आपले दागिने गहाण ठेवावे लागले. मात्र, खाणी सुरु करण्यासाठी झालेल्या अपुऱ्या प्रयत्नांंमुळे जनतेला खाण बंदीच्या माध्यमातून भाजप सरकारचा खरा चेहरा दिसून आला. ज्या पर्यटनासाठी गोवा ओळखला जायचा, त्याच पर्यटनाला आता फटका बसला आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचासुध्दा ऱ्हास झाला आहे. गोवा सध्या बेरोजगारीसाठी अधिक ओळखला जात असल्याची टीका त्यांंनी केली.
गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्ष उतरले असले तरी काॅंग्रेसच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काॅंग्रेसच जनतेला न्याय देऊ शकते व गोव्याचा विकास करु शकते. अन्य पक्ष केवळ काॅंग्रेसच्या मतांंचे विभाजन करण्यासाठी आल्याचे स्पष्ट होते. राज्यातील असो किंवा केंंद्रातील सरकार असो त्यांंनी काय काम केले, हे जनतेच्या समोर आहे.
केंद्रातील भाजप सरकारने केवळ लोकशाही ढासळण्याचे तसेच अभिव्यक्ती स्वातंंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले, असा आरोप पटोले यांंनी केला. यावेळी काॅंग्रेस नेते तौफिक मुल्लानी, श्रीनिवास खलप, सुनील कवठणकर व अन्य नेते उपस्थित होते.