Goa Election 2022 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांची संख्या वाढली, ११ आमदारांवर विविध गुन्हे; भाजपचे ५
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:23 AM2022-01-19T08:23:59+5:302022-01-19T08:24:31+5:30
डेमोक्रेटिक रिफॉर्म असोसिएशनचा अहवाल
पूजा नाईक-प्रभुगावकर
पणजी : आपला आमदार हा स्वच्छ पार्श्वभूमीचा, चांगल्या चारित्र्याचा असावा, असे मतदारांना वाटते. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विविध गुन्हे नोंद असलेले ९ आमदार निवडून आले होते. तर गेल्यावेळी, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा आकडा ११ वर पोहोचला आहे. मावळत्या विधासभेत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले ११ आमदार कार्यरत होते.
असोसिएशन ऑन डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार राज्यात २००७ साली निवडून आलेल्या ४० पैकी ९ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. यात अपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी या आमदारांवर विविध पोलीस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.
दहा वर्षांपूर्वी, २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. ९ वरून हा आकडा १२ वर पोहोचला. या १२ आमदारांपैकी २ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. अजूनही काही प्रकरणांमधील त्यांच्यावरील खटले निकाली काढण्यात आलेले नाहीत.
गेल्यावेळी, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४० पैकी ११ आमदारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या ११ पैकी ९ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यापैकी बहुतेक जण हे यंदा, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणार आहेत. ९ आमदारांमध्ये भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन तर गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद आहे.
आमदारांवर विविध गुन्हे नोंद
अपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश
पक्षनिहाय आमदारांवर गंभीर गुन्हे
५ भाजप, २ काँग्रेस, १ गोवा फॉरवर्ड, १ राष्ट्रवादी काँग्रेस
२००७ विधानसभा निवडणूक - ९ गुन्हे नोंद असलेले आमदार
२०१२ विधानसभा निवडणूक - १२ गुन्हे नोंद असलेले आमदार
२०१७ विधानसभा निवडणूक - ११ गुन्हे नोंद असलेले आमदार