पणजी : गोव्यात मावळत्या विधानसभेत फोडाफोडीचा वाईट अनुभव घेतलेल्या काँग्रेसने यावेळी खबरदारीची उपाययोजना आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्या सर्व उमेदवारांकडून निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ आणि प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली असली, तरी पक्षनेते अजूनही साशंक आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की, भाजप नेते काँग्रेसच्या निवडून येऊ शकतात, अशा उमेदवारांच्या संपर्कात आहेत आणि त्रिशंकू विधानसभा निर्माण झाल्याच काँग्रेसचे आमदार फोडण्याचा कट कारस्थान केले जात आहे. उमेदवारांकडून शपथ आणि प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली असतानाही, अशा प्रकारचे विधान प्रदेशाध्यक्षांकडून येणे म्हणजे स्वत:च्याच उमेदवारांवर चोडणकर यांचा विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
...अशी आहे पार्श्वभूमी२०१७च्या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने ४० पैकी १७ जागांवर काँग्रेसला कौल दिला. भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या होत्या, परंतु मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापन करू शकला नाही. नंतर भाजपने एकेक करून काँगेसचे १५ आमदार फोडले. सर्वात मोठी फूट जुलै २०१९ मध्ये पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेतेच इतर नऊ आमदारांना घेऊन भाजपमध्ये गेले. बाबू कवळेकर यांनी दहा जणांचा काँग्रेस विधिमंडळ गटच भाजपमध्ये विलीन केला.