Goa Election 2022: काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 09:38 AM2022-01-23T09:38:11+5:302022-01-23T09:39:10+5:30
Goa Election 2022: काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप करत या नेत्याने सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव :काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केला आहे. त्यांनी सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे. पाशेको हे स्वत: या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर इच्छुक होते.
बाणावली गट काँग्रेस समितीने उमेदवारीसाठी पाच नावे पाठवून दिली होती. त्यात मिकी यांच्या नावाचाही समावेश होता. बाणावलीत काँग्रेसने अँथनी डायस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २४ तासांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुकांनी आता आपली नापसंती जाहीरपणे उघड करण्यास सुरुवात केली आहे. पाशेको यांनी तर शनिवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्याचा राजीनामाही दिला.
एका खासगी दूरचित्रवाणीशी बोलताना पाशेको यांनी आपल्या मनाची खंत बोलून दाखविली. अर्थात त्यामागे तिकीट डावलल्याचे प्रमुख कारण होते. मिकी यांनी यासाठी दिगंबर कामत यांना दोषी ठरविले. ‘मी तीनदा बाणावलीचा आमदार होतो, तर एकवेळ नुवे मतदार संघातून विजयी झालो होतो. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मी या पक्षाच्या कार्यक्रमात लोकांना आणले होते.
स्वत: कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मी त्यांच्या सरकारात मंत्रीपदी असताना नादिया प्रकरणात त्यांनी मला राजीनामा देण्यास भाग पाडले होते’ असे पाशेको म्हणाले. दरम्यान, ‘डायस यांना उमेदवारी देण्यात फिश फॉर्मेलिन माफिया इब्राहीम मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुल्ला व आमदार विजय सरदेसाई हे पार्टनर आहेत,’ असे पाशेको म्हणाले. २०१७ साली बहुमत मिळूनही काँग्रेसची जी स्थिती झाली, तशीच यावेळीही होणार असेही पाशेकाे म्हणाले.
२४ तासांआधी पक्षप्रवेश, मग तिकीट कसे दिले? : पेरेरा
चोवीस तासांपूर्वी पक्षात प्रवेश केल्यानंतर अँथनी डायस यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस जीना पेरेरा यांनीही, काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. बाणावली मतदारसंघातील या उमेदवारीनंतर पक्षातील असंतोषाला वाचा फुटली आहे. ‘काँग्रेसची उमेदवारी ३० लाख रुपयांना विकली जाणार अशा वावड्या आधी उठल्या होत्या. मात्र आता ते सत्य असल्याचे दिसत आहे,’ असे सरचिटणीस जीना परेरा म्हणाल्या. डायस यांना उमेदवारी दिल्याबाबत परेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या स्वत: बाणावलीतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या.
गट काँग्रेस समितीतर्फे पाच नावाची शिफारस केली होती. डायस हे तृणमूलमध्ये होते. पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याच्या २४ तास आधी त्यांनी काँग्रेसप्रवेश केला. ते प्रवेश करतात काय आणि त्यांना उमेदवारी जाहीरही केली जाते हे गौडबंगालच होय’ असे त्या म्हणाल्या. ‘पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले. डायस यांना उमेदवारी जाहीर करताना पक्षाने दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीलाही अंधारात ठेवले, असे त्या म्हणाल्या.