Goa Election 2022: दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:15 PM2022-02-13T15:15:19+5:302022-02-13T15:16:35+5:30
Goa Election 2022: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना, शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना खाण विषयाची काहीच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलण्यापूर्वी त्याची माहिती दिगंबर कामत यांच्याकडून घ्यावी. कारण त्यांनीच हा घोटाळा केला असून ते सविस्तर माहिती देऊ शकतील, असा टोला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हाणला.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहूल गांधी गोव्यात येवून खाणींविषयी काहीही बोलतात. त्यांना या विषयाचे ज्ञान नसल्यामुळे तसे होते. भाजप सरकारने खाणी सुरू करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या गोव्यात निवडणूक लढविण्याच्या निर्णयासंबंधी आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांविषयी विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मतदान यंत्रावर नोटासाठी एक पर्याय असतो. नोटाला जितकी मते मिळणार त्यापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी निवडणूक काळात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीबद्दल धन्यवाद दिले. तसेच काँग्रेसच्या अपप्रचाराला लोक बळी पडणार नाहीत, असेही सांगितले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधक एकत्र झाले होते यावरूनच भाजपची शक्ती वाढल्याचे स्पष्टहोत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत भाजपला पूरण बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला.