लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी :तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गोमंतकीयांना ‘गृहलक्ष्मी’, ‘युवा शक्ती’ आणि ‘माझे घर, मालकी हक्क’ या तीन योजनांची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. येथील पक्ष कार्यालयात एआयटीसीचे नेते प्रख्यात क्रिकेटपटू कीर्ती आझाद आणि टीएमसीच्या नेत्या अविता बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त गोमंतकीयांना जमिनीवर हक्क नाही. सुमारे २०,००० मुंडकारांची प्रकरणे अजूनही मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. आजही राज्यातील ५०,००० हून अधिक कुटुंबांकडे जमीन किंवा घरे नाहीत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ना भाजपने केला, ना काँग्रेसने. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 'टीएमसी'ने ‘माझे घर, मालकी हक्क’ अभियान लाँच केले आहे. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ताब्यातील जमीन वा घराची मालकी मिळेल. इतकेच नाही तर बेघर कुटुंबांना ५०,०० हून अधिक अनुदानित घरे दिली जातील’ असे अविता बांदोडकर म्हणाल्या.
बांदोडकर म्हणाल्या, ‘आमच्या घरोघरी जाण्याच्या मोहिमेदरम्यान, घर नसल्यामुळे पिढ्या न पिढ्या त्रस्त असलेल्या लोकांना भेटलो. त्यांचे दुःख आम्हाला संपवायचे आहे.’ या योजनांच्या व्यवहार्यतेची माहिती देताना एआयटीसीचे नेते, क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले, ‘गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला ५,००० रुपये प्रती महिना मिळतील.
राज्यात या योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि आरबीआय आम्हाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. जर आपण गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर दोघांसाठी लागणारे वार्षिक बजेट एकूण बजेटच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, जे सहज शक्य आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर २५० दिवसांत सर्व योजना लागू करू. आमच्या घरोघरच्या मोहिमे दरम्यान, आम्हाला जाणवले आहे की लोक आमच्या आश्वासनांना स्वीकारतात आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’
टागोर, बोस बाहेरचे आहेत का?
तृणमूलवर बाहेरचा पक्ष असल्याचा होत असलेल्या आरोपाबाबत कीर्ती आझाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष बोस हे बंगालचे आहेत की भारताचे? शिवाजी महाराज मराठी की भारतीय? आम्ही बाहेरचे आहोत तर पंतप्रधान मोदी दिल्लीत काय करत आहेत? राज्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यात शांतता, समृद्धी आणि बंधुता वाढवण्यासाठी 'टीएमसी' प्रयत्न करेल’ असे आझाद म्हणाले.