प्रसाद म्हांब्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा : निवडणुकीचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे, तशी बार्देश तालुक्यातील बंडखोरीत भर पडत आहे. रिंगणातील विविध पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर बंडखोरीचा पक्षांना फटका वाढत गेला आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने उमेदवाराने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे.
साळगाव मतदारसंघातून जयेश साळगावकर यांनी भाजपात दिलेल्या प्रवेशानंतर सुरू झालेले हे बंडखोरीचे सत्र हळदोण्यातून तारक आरोलकर यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर कायम राहिले आहे. काही जणांनी तर पक्षाकडून उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अपक्ष म्हणूनसुद्धा रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील एकूण सात मतदारसंघातील सर्व मतदारसंघातून बंडखोरी झाल्याचे चित्र अनुभवायला मिळाले आहे.
सर्वाधिक झळ काँग्रेसला
इतर पक्षाच्या तुलनेत बंडखोरीची सर्वात जास्त झळ काँग्रेस पक्षाला बसली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या बऱ्याच नेत्यांनी तृणमूलची कास धरली होती. तसेच आताही त्यांना झळ बसणे सुरुच आहे. भाजपलासुद्धा बऱ्याच मतदारसंघातून बंडखोरीचा सामना करावा लागला. काही मतदारसंघात मात्र त्यांना बंडखोरी थोपवून धरण्यास यश प्राप्त झाले आहे. काहींनी तर दोन ते तीनवेळा बंडखोरी करण्याचे प्रकारही केले आहेत.
साळगावापासून प्रारंभ
तृणमूलच्या गोव्यातील प्रवेशानंतर साळगावातील काही नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि बंडखोरीला आरंभ झाला; मात्र त्याला खरी गती सुमारे दीड महिन्यापूर्वी साळगांवचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मिळाली. साळगावातील काँग्रेस उमेदवार केदार नाईक, जि.प. सदस्य रुपेश नाईक तसेच इतरांनी त्याला विरोध करून पक्षाशी बंडाळी केली.
कळंगुट, शिवोलीतही झळ
कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो यांच्या काँग्रेस प्रवेशाला आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा तसेच अँथोनी मिनेझीस यांनी जोरदार विरोध केला. त्यांचा विरोध झुगारून लोबो यांनी प्रवेश दिल्यानंतर या सर्वांनी बंड पुकारून पक्ष त्याग केला. शिवोलीतूनही डिलायला लोबो यांच्या प्रवेशाला विरोध झाल्याने दत्ताराम पेडणेकर यांनी बंड पुकारून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
आरोलकर म्हापशातून लढणार
हळदोणा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी उमेदवारी जाहीर झालेले ॲड. कार्लुस परेरा तसेच ॲड. तारक आरोलकर हे दोन इच्छुक होते. पण, परेरा यांंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आरोलकर यांनी बंडखोरी करून पक्षत्याग केला. तसेच ते आता म्हापसा मतदारसंघातून तृणमूलच्या उमेदवारीवर रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
थिवी, पर्वरीतही बंंडाळी
थिवीतून काँग्रेसचे दावेदार उदय साळकर हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारात होते. पण, अमन लोटलीकर यांना दिलेल्या प्रवेशानंतंर त्यांनी आम आदमीत प्रवेश करून त्या पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरणार आहेत. पर्वरी गट काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. शंकर फडते, संदीप वझरकर यांनीसुद्धा आपल्या पक्षाशी बंडाळी करून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.