लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : वेळोवेळी निवडून येवून पक्षांतर करणारे प्रकार टाळण्यासाठी यावेळी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना इतर पक्षांत न जाण्याची शपथ दिली आहे. पणजीतील महालक्ष्मी मंदिरात शपथ घेतल्यानंतर बांबोळी येथील फुलांखुरीसच्या चेपेलमध्येही जाऊन पक्षाने आपल्या उमेदवारांना शपथ दिली.
शनिवारी संध्याकाळी झालेल्या या शपथविधीचा पहिला भाग पणजीतील महालक्ष्मी देवळात झाला. त्यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, धर्मेश सगलानी, प्रसाद गावकर, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडिस, जनार्दन भंडारी व इतर उमेदवारांचा समावेश होता. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम यांच्यासह प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते. याठिकाणी शपथ घेतल्यानंतर बांबोळी येथील फुलांखुरीस चेपलमध्ये जाऊनही शपथ घेतली. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘हेवटेन तेवटेन’ न जाण्याचे गाऱ्हाणे
महालक्ष्मी देवस्थानच्या पुजाऱ्यांनी त्यांना शपथ दिली आणि सर्वांनी ती मागून म्हटली ती अशीः महालक्ष्मी, तुझ्या चरणाशी आम्ही ३६ जण श्रीफळ ठेवून प्रतिज्ञा करीत आहोत. कॉंग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आम्ही निवडून आल्यावर '' हेवटेन तेवटेन" न जाता कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू. पक्षात राहून पक्षाचा विकास होईल असे काम करू. पक्षाला कोणताही त्रास न करता, बाधा न येता काम करू. महालक्ष्मीला श्रीफळ ठेवून प्रतिज्ञा करतो आहे की निवडून आल्यावर पाच वर्षांसाठी ''हेवटेन तेवटेन" न जाता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू.